मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे करण्याच्या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.28 डिसें.) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले.
वास्तूचा गौरव करण्यासारखे
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही राज्याच्या विकासाच्या गाडीचा वेग मंदावू न देण्याची दक्षता घेण्यात आली. यामुळेच राज्यात उद्योग क्षेत्राशी निगडीत असे 61 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्पांची कामे धडाक्यात सुरू आहेत. यातीलच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. निर्धारित वेळेत हे विमानतळ जनतेच्या सेवेत रूजू करण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे. या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मराठी माणसाला आत्मभान देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. मराठी माणसाला उत्तुंग झेप घेता यावी, यासाठी त्याच्या पंखात बळ भरण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे हा त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे, असे नामकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी विनंतीही नगरविकास मंत्री शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा -चोरी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू
हेही वाचा -चोरी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू