मुंबई :राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पंचनाम्यांना विलंब होत आहे. दरम्यान, मंत्री दिपक केसरकर यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यांना संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत सध्याच्या सरकारने आणि यापूर्वीच्या सरकारने केलेली मदत जनतेने तपासून बघावे. ज्यावेळी अवकाळी झाला. शेतकऱ्यांचे त्यात नुकसान झाले आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी उभा राहिलेला आहे. परंतु, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. संपामुळे पंचनामे झालेले नाहीत.
युद्धपातळीवर पंचनामे :मंत्री दिपक केसरकर म्हणाले की, आता संप मागे घेण्यात आल्याने जलदगतीने युद्धपातळीवर पूर्ण केले जातील. तसेच शेतकऱ्यांना पूर्ण मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी काहीही काळजी करायची गरज नाही. हे शासन सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
लवकरच आनंदाचा शिधा वाटप :आनंदाचा शिधा शासनाच्या गोडाऊनमध्ये गेलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिधा वाटप झालेले नाही. संबंधित विभागाचे अधिकारी लवकरच राज्यातील सर्व आणि तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानात हा शिधा पोहचवण्याचे काम करतील, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. संपामुळे थोडाफार उशीर झाला आहे. परंतु गुढीपाडवामुळे तोंड गोड होणार आहे. आजवर कोणत्या शासनाने आनंद शिधा वाटला नव्हता. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच आनंद शिधा वाटला जात आहे, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.