मुंबई -मध्यप्रदेश सारखा प्रयोग महाराष्ट्रात करण्यासाठी राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असे विधान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. ते विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
रंगपंचमीच्या मुहूर्तावर ज्याप्रमाणे मध्यप्रदेशमध्ये भूकंप झाला तसा महाराष्ट्रातही गुढी पाडव्याला होईल, असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले. यावर पत्रकारांनी विचारल्यावर असा मुहूर्त शोधणं हे मुनगंटीवारांचे काम आहे. असा टोला मुंडे यांनी मुनगंटीवार यांना लगावला आहे. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाचा आनंद महाराष्ट्रातील भाजपला घ्यायचा असेल, तर गुढी पाडव्यापर्यंतच काय तर येणाऱ्या दिवाळीपर्यंत जरी घेतला तरी तो मध्यप्रदेशचाच घ्यावा लागेल. महाराष्ट्रात असा आनंद भाजपच्या नेत्यांना घेता येणार नाही. असेही मुंडे म्हणाले.