मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यात 19 डिसेंबरपासून नागपूरात सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्याच्या हिताचे आणि विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याची संधी आहे. त्यामुळे विरोधकांनी केवळ विरोध न करता राज्याच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सरकारच्या वतीने केले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न सोडवण्यात सरकारला यश आलं आहे असा दावाही मंत्री केसरकर यांनी यांनी केला आहे.
शिक्षण क्षेत्रातही बदल करणार :राज्य सरकारच्या वतीने शिक्षण क्षेत्रातही अमुलाग्र बदल करण्याचा विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करणे शाळेच्या वेळा नियमित करणे याबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण देणे याची आम्ही तयारी केलेली आहे. विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवता यावे यासाठी क्रीडा विभागामार्फत ही अनेक नवीन संकल्पना राबवल्या जाणार आहे. त्यामुळे विविध विभाग एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत, असेही केसरकर यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाच्या विकासात मुख्यमंत्र्यांचा वाटा : समृद्धी महामार्गाच्या विकासामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठा वाटा उचलला आहे. त्यांच्याकडे असलेल्या विभागाच्या माध्यमातून हा मोठा मार्ग तयार झाला असून हा देशातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मार्ग आहे. एवढे मोठे काम करणाऱ्या शिंदे यांचे कौतुक होणारच त्यामुळे विरोधकांनी संकुचित राजकीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन विचार करावा, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे.