मुंबई :ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केले आहेत. गिरनार ऍग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून जमा केले. मात्र, कंपनीच्या वेबसाईटवर फक्त एक कोटी 67 लाखांचे शेअर्स तेही 47 सभासदांच्या नावावर दिसत आहेत. ही शेतकऱ्यांची लूट असून, या संदर्भात लवकरच स्पोट होईल, असे ट्विट राऊत यांनी केले होते. दरम्यान, राऊत यांचे हे ट्विट मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात वाचून दाखवले. तसेच, त्यांनी त्यांनी राऊत यांना कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले भुसे?:राउत यांनी केलेले ट्विट सभागृहात वाचून दाखवल्यानंतर दादा भुसे यांनी संजय राऊत यांना महा गद्दार म्हणत या संदर्भात आपण सभागृहाला विनंती करतो की आपण जगाच्या पाठीवरील कोणत्याही तपास यंत्रणेद्वारे आपली चौकशी करावी, या चौकशीत जर आढळले तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ. मात्र, आपल्याला गद्दार बोलणारे हे महागद्दार नेते आमच्याच मतावर निवडून येतात आणि अशी भाषा करतात. त्यांनी जर केलेले ट्विट खोटे आढळले तर राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची :या संदर्भात बोलताना दादा भुसे म्हणाले, की राऊत यांनी आपल्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा. कारण, हे मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवारांची चाकरी करतात असा जोरदार टोला भुसे यांनी लगावला आहे. जर राऊतांनी माफी मागितली नाही तर शिवसैनिक या गद्दाराला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दांत दादा भुसे यांनी राऊतांवर तोफ डागली. शरद पवार यांचे नाव घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक :राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आणि विरोधकांनी वेलमध्ये येत दादा भोसले यांनी पवारांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. दादा भुसे यांनी सभागृहाची माफी मागावी आणि हे वाक्य कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. दरम्यान, दादा भुसे यांनी आपण काहीही चुकीचे बोललो नाही त्यामुळे माफी मागणार नाही असे म्हटले. तर, हे वाक्य चुकीचे असल्यास कामकाजातून काढून टाकण्यात येईल असे विधानसभा अध्यक्षांनी करत वादावर पडदा टाकण्याचे काम केले.
हेही वाचा : Chitra Wagh Criticizes Sanjay Raut: सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज बाळगा; चित्रा वाघ यांचे ताशेरे