मुंबई - राज्यात कोरोना वाढत आहे. त्यातच राज्यातील अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या चार दिवसात पाच मंत्र्यांना कोरोनाने गाठले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली.
अनेकांना कोरोनाची बाधा -
कोरोनाच्या लाटेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच कोरोनाच्या लागण झाली असल्याची माहिती त्यांनीही ट्विटरवर दिली आहे. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा यात समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले होते. तर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. तर काँग्रेसचे प्रदेशाद्याक्ष नाना पटोले यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना कोरोना झाल्याने ते स्वतः अलगीकरण कक्षेत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना तर तीनदा कोरोना झाला आहे. तर त्यांच्या सून आणि खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या सर्व मंत्र्यांनी अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी काळजी घ्यावी, तसेच गरज पडल्यास लवकरात लवकर कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन या नेते मंडळींनी केली आहेत.
मुंबईमध्ये मार्चपासून सुरू असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता. यामुळे सर्व व्यवहार टप्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. मुंबईची लोकल ट्रेनही एक फेब्रुवारीपासून सर्वसामान्य सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ भागात तर लोकडाऊन करण्यापर्यंत परिस्थिती बिकट झाली आहे. तसेच कोरोनासंदर्भात नियम कडक करणे असेल किंवा लॉकडाऊन करावे लागणार असेल तर स्थानिक प्रशासनाला ते करण्यात येतील, असे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा -महाराष्ट्र कोरोना अपडेट: रुग्णसंख्या वाढ सुरूच, 6971 नवीन रुग्ण, 35 मृत्यू
खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) ऑनलाइनच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत, असा सल्ला दिला. तसेच आठ दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली नाही, जनतेने नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच राज्यभरात प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
सुरुवातीच्या कोरोना लाटेचा फटका बसलेले नेते मंडळी -