मुंबई- आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिल्यानंतर कॉंग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी थेट मुंबई कॉंग्रेस अध्यक्षांच्या नेतृत्वावरच आक्षेप घेतला आहे. पक्षातील नाराजी यामुळे उघड झाली आहे. मात्र, हा पक्षांतर्गत विषय असून तो आम्ही बसून सोडवू, त्याला फार काही महत्व देण्याची गरज नाही, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
तक्रार थेट दिल्लीला
कॉंग्रेस पक्षाच्यावतीने वांद्रे विधानसभा मतदार संघात कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यमंत्री सतेज पाटील यांना कार्यक्रमाला निमंत्रित केले होते. पण, स्थानिक आमदार म्हणून मला बोलवले नाही. माझ्याविरोधात पक्षाकडून कारवाया सुरू आहेत, असा आरोप आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. मुंबई युवा काँग्रेस निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवाराला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही, असा इशाराही जगताप यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सिद्दीकी यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सिद्दीकी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, के.सी.वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांना पत्र दिले आहे.