मुंबई - "त्यांच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यलढ्याला विरोध करत कायमच इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि हेच भाजपचे खरे रूप आहे" अशा शब्दात थोरात यांनी एक ट्विट करून अनंत कुमार यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींची स्वातंत्र्याची चळवळ हे एक नाटक होते, असे विधान केल्याने देशभरात त्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा -'माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते'; 'त्या' वक्तव्यावरून केंद्रिय मंत्री हेगडे यांचे घूमजाव
अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्याची दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हेगडे सारख्या प्रवृत्तीकडे माध्यमांनी दुर्लक्ष करावे, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी सोमवारी बंगळूरू येथे एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेला संपूर्ण स्वातंत्र्य लढा ब्रिटिशांच्या संमतीने आणि पाठिंब्याने लढला गेला, यामुळे तथाकथित नेत्यांना कधीही पोलिसांनी मारहाण केली नाही. स्वातंत्र्य लढा हे एक मोठे नाटक होते. ही खरी लढाई नसून हा जुळवून आणलेला लढा होता' असे आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर थोरात यांनी एक ट्विट करून त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
हेही वाचा -राहुल गांधींचे वडील मुस्लीम, तर राहुल ब्राह्मण कसे? केंद्रीय मंत्री अनंतकुमार बरळले
दरम्यान, मंगळवारी सकाळी आझाद मैदानात मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या असता त्यांनी हेगडे सारख्या लोकांच्या विधानाकडे माध्यमांनी आणि समाजानेही दुर्लक्ष करावे, असे मत व्यक्त केले. महात्मा गांधी यांना देशाचा राष्ट्रपिता म्हणून स्विकारत असताना त्यांच्या संदर्भात असे विधान करणे हे अत्यंत गैर असून अशा प्रकारच्या विकृतींकडे माध्यमांन दुर्लक्ष करावे, असेही सुळे यांनी म्हटले आहे.