मुंबई - कोरोनाची लागण झाल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून मुंबईतील एका खासगी रुग्णालयात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा स्थितीत त्यांनी आज (गुरुवार) काँग्रेसने सुरू केलेल्या 'स्पीक अप इंडिया' या ऑनलाईन मोहिमेत रुग्णालयातून आपला सहभाग नोंदवला.
देशात या महामारीच्या संकटाचा सर्वात जास्त सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, गरीब आणि मध्यम उद्योगांना फटका बसला आहे. यामुळे काँग्रेसकडून आज राबवण्यात आलेल्या 'स्पीक अप इंडिया' या मोहिमेच्या माध्यमातून देशातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ज्या उपाययोजना सुचवल्या आहेत, त्याचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली. यासाठी त्यांनी ट्विट जारी करून आपला व्हिडिओ त्यासोबत जोडून केंद्राला आवाहन केले आहे.