मुंबई -राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने (सक्तवसुली संचालनालय) बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर ते चौकशीसाठी 'ईडी' कार्यालयात हजर झाले आहेत. 'ईडी' कार्यालयात जाण्याच्या आधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'ईडी'च्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले. तसेच ईडीने आपल्याला समन्स कोणत्या कारणासाठी बजावला आहे, याबाबत स्पष्टता नसल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली.
'मी कोणताही गैरव्यवहार केला नाही' -
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलांची शपथ घेऊन मी पुन्हा एकदा सांगतो की, मी कोणताही गैरव्यवहार केला नाही, तसेच चौकशी दरम्यान 'ईडी'ने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देणार आहोत. आपल्याला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. असेही अनिल परब यांनी म्हटेल. यापूर्वीही 'ईडी'ने अनिल परब यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी आपण चौकशीला हजर राहू शकणार नाही, असे अनिल परब यांनी 'ईडी'ला कळवले होते. त्यानंतर 'ईडी'ने दुसर समन्स पाठवत 31 ऑगस्टला हजर राहण्याचे सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी अनिल परब यांनी आजची वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ते आज 'ईडी' कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.
परबांविरोधात 'ईडी'कडे तीन तक्रारी
'ईडी'कडे मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिसांचे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून त्यांच्याबद्दल केलेला उल्लेख, त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींचा समावेश आहे. 'ईडी'ने परबांना नोटीस बजावून ३१ ऑगस्टला ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, परब पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे कळवत गैरहजर राहिले होते. त्यानंतर आज (२८ सप्टेंबर) परब यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे, असे 'ईडी'ने पाठवलेल्या समन्समध्ये नमूद केले होते. त्यानुसार परब आज 'ईडी'च्या चौकशीला सामोरे जात आहेत.
chronology समज लिजीये, संजय राऊतांची केंद्रावर टीका
परबांना आलेल्य्या नोटीशी संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊतांनी ट्विट केले होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर अनेक आरोप केले. 'शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, जय महाराष्ट्र!', असे ट्वीट संजय राऊत यांनी केले होते.
शिवसेनेचे पंचरत्न ईडीच्या रडारवर
शिवसेनेचे 5 मोठे नेते ईडीच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत. तर माजी खासदार आनंदराव अडसूळांवर सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील 900 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळीही ईडीच्या रडारवर आहेत. भावना गवळी यांनीही मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे.