मुंबई- महाराष्ट्रातून परराज्यात ज्या ट्रेन सोडण्यात येणार आहेत, त्याबाबतची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ज्या लोकांना परराज्यात जायचे आहे त्यासाठी पोलीस स्टेशनला आपल्या ग्रूप लीडरच्या माध्यमातून फॉर्म भरून द्यावे लागणार आहेत, अशी माहिती कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी दिली. या फॉर्ममध्ये मुंबईतील निवासी पत्ता, कुठे जाणार आहे तो पत्ता, संपर्क क्रमांक व आधार कार्ड ही माहिती भरावी लागणार आहे.
यासोबतच बस किंवा ट्रेन यापैकी कोणत्या वाहनाने प्रवास करायचा याचा उल्लेख करावा लागणार आहे. विशेष म्हणजे त्या प्रवासी व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रही द्यावे लागणार आहे. साधारण एका ट्रेनमध्ये एक हजार जणांना पाठवण्यात येणार आहे. या हजार जणांची यादी आल्यास त्यांच्या प्रवासाचे तिकीट आधीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे परब म्हणाले.