महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक आयोगाचा खार येथे छापा; भाजपच्या छुप्या प्रचाराचा पर्दापाश - भरारी पथक

भाजपने मोदींच्या आवाजाचे लाखो कार्ड तयार केले असून भरारी पथकाने यावर धाड टाकली आहे.

मोदींच्या आवाजातील लाखो कार्ड जप्त

By

Published : Apr 9, 2019, 6:03 PM IST

Updated : Apr 9, 2019, 10:47 PM IST

मुंबई- चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मुंबई लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. उद्यापासून खऱ्या प्रचाराला सुरूवात होणार आहे. पण त्या अगोदरच भाजपच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. काँगेसने भाजपच्या खोट्या प्रचाराचा पर्दापाश केला आहे.

मोदींच्या आवाजातील लाखो कार्ड जप्त

खार येथील भाजप कार्यालयात मोदी यांची प्रतिमा असलेले प्रचार कार्ड तयार करण्यात येत होते. या कार्डमध्ये सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करण्यात आला आहे. कार्ड उघडल्यावर यामध्ये पंतप्रधान मोदींचा आवाज, कमळाला मतदान करा, असे संदेश ऑडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहे, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या भरारी पथकाने खार येथे छापा मारला.

यावेळी पथकाला मोंदीच्या आवाजातील कार्ड सापडले. यात सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख व सैनिकांचे फोटोदेखील होते. त्यानंतर पथकाने प्रचार कार्ड बनवणाऱ्या भागाला पूर्णपणे सील केले. यावेळी काँगेसचे राजू वाघमारेही उपस्थित होते. काही तरुण मुलेही काम करत होती. त्यांना या कामाचे दिवसाला ३०० ते ३५० रुपये मिळत होते. या घटनेनंतर अमित शहा याच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे, की कोणत्याही प्रकारे निवडणुकीच्या प्रचारात भारतीय लष्कराचा वापर करण्यात येऊ नये. असे असताना भाजपकडून छापण्यात आलेल्या या प्रचार कार्डात सर्जिकल स्ट्राईकचा वापर करण्यात आला आहे. या प्रचार कार्डवर कोणत्याही प्रकाशकाचे नाव नाही. त्यामुळे अमित शहा तसेच ज्यांचा आवाज आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे राजू वाघमारे यांनी सांगितले.

Last Updated : Apr 9, 2019, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details