मुंबई : महाराष्ट्रात दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सहकारी दूध संघांच्या 22 संघटनांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. चितळे, थोरात, कात्रज, थोटे, पूर्ती, सोनई दुधाचे दर वाढले आहेत. मंगळवारी सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रातील 22 प्रमुख खासगी व सहकारी दूध संघांची बैठक आयोजित करण्यात आली होती. दूध खरेदीचे दर, दूध पिशवी पॅकिंग आणि वाहतूक खर्च वाढला आहे.
दरात वाढ करण्याचा निर्णय : राज्याच्या बाजारपेठेत बिगर राज्य दूध संघांची विक्री वाढली आहे. त्यामुळे स्पर्धा टाळण्यासाठी दुधाच्या किरकोळ दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून, काही दूध संस्थांनी प्रमुख वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन (सर्व्हिस चार्ज) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दूध आस्थापनांचे विक्री दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
दूध उत्पादक शेतकरी अडचणीत :पुण्याीतल कात्रज डेअरीच्या दुधाच्या दरात वाढ झाली आहे. पशुखाद्याचे वाढलेले दर तसेच गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरात होत असलेल्या वाढीमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या स्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने कात्रज येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने दरवाढ :सध्या गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तसेच पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे दूध वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च येत आहे. पशुखाद्याचे आणि चाऱ्यांचे दर देखील वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी दिलेला दर परवडत नाही. तर दुसरीकडे लंपी आजारामुळे देखील शेतकरी आर्थिकरित्या चांगलाच डब्यात गेला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूनेच ही दरवाढ करण्यात आली आहे.
दूध खरेदी दरात वाढ :पुणे जिल्हा उत्पादक संघाने दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर मागे दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दुधाचा 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी खरेदी दर संस्थांसाठी वरकड खर्चासोबत प्रतिलिटर 37 रुपये 80 पैसे असणार आहे. हे दुधाचे नवे दर 1 फेब्रुवारीपासून लागू झाले आहे. संघाचे संचालक मंडळाच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. गाय दूध ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी खरेदी दर प्रति लिटर वरकड खर्चासह संस्थांसाठी रु. ३७.८० असेल. दूध खरेदी दरात वाढ करावी लागत आहे. त्यामुळे कात्रज दुधाच्या विक्री दरातदेखील वाढ करण्यात येत आहे. टोण्ड, डबल टोण्ड, प्रमाणित व मलई दुधाच्या दरात प्रति लिटर प्रत्येकी २ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा : Amul Price Hike : अमूलचे दूध पुन्हा महागले, जाणून घ्या नवे दर