मुंबई Milind Deora Resigns from Congress : काँग्रेस नेते तथा माजी खासदार मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. अशातच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांनी स्वतः एक्स (पुर्वीचं ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिलीय. माजी खासदार देवरा हे काँग्रेसमधील सदस्यत्वाच्या राजीनाम्यानंतर शिवसेना ( शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. शनिवारीच 'ईटीव्ही' भारतनं याबाबत वृत्त प्रकाशित केलं होतं. त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं माजी खासदार देवरा यांनी आपल्या सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटलंय.
काय असू शकतं नाराजीचं कारण : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार सघांत 2004 ते 2014 या काळात मिलिंद देवरा हे खासदार होते. पण मागील दोन लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदार संघावर शिवसेनेचं वर्चस्व दिसून आलं. शिवेसनेचे नेते ( ठाकरे गट) अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. त्यानंतर दक्षिण मुंबईत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. दरम्यान यावर्षी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेस हे लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत. त्यातच दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केलाय. त्यामुळं काँग्रेसकडे ही जागा न आल्यामुळं माजी खासदार देवरा नाराज होते. यामुळं ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आजच दुपारी दोन वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.