मुंबई Milind Deora Quits Congress :शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस पक्षाला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षातून बाहेर पडल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यावर काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र सरकारवर टीका केली आहे. असंवैधानिक सरकारचा शेवट होणार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
विकासाच्या मार्गावर जातोय : मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया वरून दिली. थोड्या वेळापूर्वी माध्यमांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, "मी विकासाच्या मार्गावर जात आहे " असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.
असंवैधानिक सरकारचाही शेवट होणार - नाना पटोले :"आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळंच यात्रेपासून दुसरीकडं लक्ष वळवण्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत. काँग्रेस फुटणार अशा अफवा उठवणारे भाजपा आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेत आहेत. त्यावरुन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत, पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजपा, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवटही होणार आहे."
राजीनाम्याचा फेरविचार करा - वर्षा गायकवाड : " सकाळी मिलिंद देवरा यांचं मी ट्विट बघितलं, काँग्रेस पक्षाचा राजीनामा त्यांनी दिला. देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार एक वेगळं समीकरण आहे. आपण घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला आहे. आपल्या सोबत संवाद करण्याचा प्रयत्न केला, मी असेल किंवा प्रभारी असेल, आमचा हाच प्रयत्न राहिला की काँग्रेस परिवार एकत्र राहिला पाहिजे. आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत आहे आणि अशा वेळी त्यांनी घेतलेला हा निर्णय मनाला खेद लावणारा आहे."
हेही वाचा :
- माजी खासदार मिलिंद देवरा काँग्रेसचा 'हात' सोडणार? 'या' पक्षाकडे मागणार 'साथ'?
- काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक; जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर नाना पटोलेंचं मोठं विधान
- उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर तरी निवडणूक आयोगानं सुधारलं पाहिजे - नाना पटोले