मुंबई Milind Deora News : राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत असून हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. काँग्रेस नेता आणि माजी खासदार मिलिंद देवरा काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी मिलिंद देवरा यांना तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यामुळे ते नाराज झाले असून, काँग्रेसला लवकरच राम-राम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय असू शकतं नाराजीचं कारण : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार सघांत 2004 ते 2014 या काळात मिलिंद देवरा हे खासदार होते. पण मागील दोन लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदार संघावर शिवसेनेचं वर्चस्व दिसून आलंय. अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला आणि दक्षिण मुंबईत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला. दरम्यान यावर्षी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेस लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत. त्यातच दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केलाय. त्यामुळं काँग्रेसकडे ही जागा न आल्यामुळं मिलिंद देवरा नाराज असून, लवकरच ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाबद्दल बोलताना मंत्री उदय सामंत यांनी, देवरा हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारायला तयार असल्यास त्यांचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठांचं दुर्लक्ष : मागील आठवड्यात मिलिंद देवरा यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असून, या मतदार संघात देवरा कुटुंबाचं मोठं योगदान आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षानं आपल्या उमेदवारीचा विचार करावा," मात्र यानंतरही वरिष्ठांनी याकडं कानाडोळा केला, दुर्लक्ष केलंय. याच काळात मिलिंद देवरा यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा राहुल गांधीशी संपर्क झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळं मिलिंद देवरा पक्षावर आणि वरिष्ठावर नाराज आहेत. तसंच शनिवारी ते प्राथमिक सदस्याचा राजीनामा देणार असल्याचं सुद्धा बोललं जातंय.