मुंबई- शेतकऱ्यांचे मुख्य मुद्दे निवडणुकीत केंद्रस्थानी आणण्यासाठी 2 ऑक्टोबरपासून किसान सभा व शेतकरी संघटनांनी 'मी शेतकरी' अभियान सुरू केले आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट हमीभावासाठी कायदा व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या मागण्या केंद्रस्थानी आणण्यासाठी गावोगाव अभियान राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -वडिलांसाठी मुलाचा त्याग, संदीप नाईक यांनी गणेश नाईकांसाठी सोडला मतदारसंघ
'मी शेतकरी' अभियानांतर्गत गावाच्या पारावर, चावडीवर शेतकरी निवडणूक काळात राज्यभर गावोगाव ठिय्या देणार आहेत. प्रचारासाठी गावात येणाऱ्या राजकीय पक्षांना शेतकरी प्रश्नांबाबत जाब विचारणार आहेत. सभा घेणाऱ्या पक्षांना शेतकरी कर्जमुक्ती व हमीभावाबाबत भूमिका मांडण्यास भाग पाडणार आहे. आज 2 ऑक्टोबरला या अभियानाची सुरुवात झाली. अहमदनगरमधील अकोले येथून भव्य रॅली काढून या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
'मी शेतकरी' अभियानास सुरुवात हेही वाचा -गांधी जयंतीनिमित्त आझाद मैदान ते गेट ऑफ इंडियापर्यंत व्यसनमुक्तीसाठी रॅली
तर परभणी जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये पारावर ठिय्या मांडून शेतकऱ्यांनी या अभियानाचा शुभारंभ केला. सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, अमरावतीसह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना निवेदन देऊन हे अभियान सुरु करण्यात आले.