मुंबई- शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार मुंबईत मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. आज पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता म्हाडा या इमारतींची जबाबदारी घेणार आहे. त्यामुळे त्यामधील अनेक अडचणी दूर होणार आहेत. तसेच या माध्यमातून मुंबईतील लाखो लोकांना त्याचा लाभ होणार असल्याचे सामंत म्हणाले.
मुंबईत मोडकळीस आलेल्या आणि १९४० च्या पुर्वीच्या जुन्या इमारती इमारती आहेत. त्या केवळ दुरुस्ती करण्यापेक्षा कायमस्वरूपी मार्ग निघावा म्हणून सेज इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाणार आहे. त्यांची डागडुजी करण्यापेक्षा आता त्यांचा पुनर्विकास करणे हाच त्यावर मार्ग आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच धोरण आणले जाणार आहे. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यास म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.