मुंबई - ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 272 घरासाठी उद्या (गुरुवारी) लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून झाली होती. मात्र, आज (बुधवारी) रात्री उशिरा मंडळाने ही लॉटरी पुढे ढकलत 3 नोव्हेंबरला काढण्यात येईल, असे जाहीर केले आहे. गुरुवारी साडे बारा वाजता ही लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र, कॅबिनेटच्या बैठकीमुळे लॉटरीसाठी वेळ अपुरा पडत असल्याने, सर्व मंत्री, आमदारांना उपस्थित राहणे शक्य होत नसल्याने ही लॉटरी 3 नोव्हेंबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी जीवन गलांडे यांनी दिली. ते 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
पात्र रहिवाशांना पुनर्वसित इमारतीत कुठे आणि कितव्या मजल्यावर घर मिळणार हे या लॉटरीद्वारे निश्चित केले जाणार आहे. तर रहिवाशांना ही यामुळे एक हमी आणि सुरक्षितता मिळणार आहे. त्यामुळे या लॉटरीकडे रहिवाशांचे विशेष लक्ष होते. त्यानुसार 29 ऑक्टोबरला लॉटरी काढण्याची सर्व तयारी मंडळाने केली होती. रहिवाशांनाही याची माहिती दिली होती. मंत्र्यांची वेळही घेतली होती. मात्र, बुधवारची कॅबिनेट गुरुवारी बोलण्यात आल्याने मंडळाची अडचण वाढली. काही झाले तरी उद्या लॉटरी घ्यायची यासाठी आज मंडळाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, शेवटी लॉटरी योग्यरित्या पार पाडावी आणि कोणत्याही अडचणी येऊ नये असा विचार करत लॉटरी 3 नोव्हेंबरला काढण्याचा निर्णय घेतल्याचे गलांडे यांनी सांगितले आहे.