मुंबई :शहरातील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील 4,082 सदनिकांची परवडणाऱ्या दरात विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या लॉटरीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ताडदेवमधील ७ कोटी किमतीच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडही सामील झाले असल्यामुळे या सोडतीकडे सर्वांचच लक्ष लागले आहे.
1 लाख 20 हजार 144 अर्ज पात्र - पहाडी गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजना, उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गट अशा विविध प्रकारांमध्ये म्हाडाने अर्ज मागविले होते. म्हाडातील घरांसाठी 1 लाख 20 हजार 144 अर्ज पात्र ठरले आहेत. गृहनिर्मिती क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करणे अवघड आहे. मात्र, हे अशक्य नाही. पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात अधिकाधिक घरांची निर्मिती होऊ शकते. याकरता पुनर्विकास प्रकल्पांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायदे व नियमावलीमध्ये बदल करण्यासंदर्भात विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
सोडतीमधील पारदर्शकतेसाठी ऑनलाईन प्रक्षेपण - सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता म्हाडाकडून सोडतीचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीचे कामकाज पाहता येणार आहे. त्यासाठी म्हाडाचे ऑनलाईन प्रेक्षपण https://www.youtube.com/live/UsZDZUL3YyA?feature=share या लिंकवर तुम्ही पाहू शकता. म्हाडाने अर्जदारांकडून ऑनलाईन माहिती मागविल्याने यंदा म्हाडाच्या घरांची विक्रीची प्रक्रिया वेगवान पद्धतीने झाली आहे. विजेत्या अर्जदारांची यादी https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर सायंकाळी ६:०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.