महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातील ८६४ सदनिकांच्या वितरणाची ऑनलाईन सोडत - म्हाडा औरंगाबाद

म्हाडा औरंगाबाद मंडळातर्फे औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिकांच्या वितरणासाठी ऑनलाईन सोडत काढण्यात आली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, औरंगाबादमध्ये म्हाडातर्फे आणखी 5 हजार 500 घरे बांधली जाणार आहेत.

मुंबई
मुंबई

By

Published : Jun 10, 2021, 10:07 PM IST

मुंबई - 'महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) गृहबांधणीत यशस्वी प्रयोग केले आहेत. म्हाडाच्या पारदर्शक, विश्वासार्ह संगणकीय सोडतीमुळे सर्वसामान्य नागरिक गृहस्वप्नपूर्तीसाठी म्हाडाचा पर्याय प्राधान्याने निवडत आहेत. म्हाडा हा गृहनिर्मितीतील विश्वसनीय ब्रँड अधिक व्यापक करण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळेच म्हाडा व खासगी विकासकांच्या सहकार्याने संयुक्त भागीदारी प्रकल्पाद्वारे परवडणाऱ्या दरातील गृहनिर्मितीवर भर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे', असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

म्हाडा औरंगाबाद मंडळातर्फे औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिकांच्या वितरणासाठी ऑनलाईन सदनिका सोडत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे काढण्यात आली.

औरंगाबादमध्ये आणखी 5,500 घरं बांधणार

'म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे चिखलठाणा, नक्षत्रवाडी व ऑरिक सिटी येथे ५ हजार ५०० परवडणाऱ्या सदनिकांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच या तीनही ठिकाणी गृहनिर्मिती प्रकल्पाला सुरवात केली जाणार आहे. या माध्यमातून औरंगाबादकरांना म्हाडाची परवडणारी घरे उपलब्ध होतील', असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.

सुभाष देसाईंची मोठी घोषणा

'म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणालीसोबतच, दर्जेदार घरं व उत्कृष्ट सदनिका वितरण प्रक्रिया या सर्व बाबींनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जोपासला आहे. त्यामुळेच औरंगाबाद मंडळाच्या ८६४ सदनिकांसाठी ८ हजार २२६ अर्ज प्राप्त झाले. सदनिका सोडतीला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता म्हाडाची घरं खऱ्या अर्थाने परवडणारी असल्याचे द्योतक आहे. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अधिक परवडणारी घरं उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वाळुंज (तिसगाव) येथे म्हाडाला १३ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे', असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

म्हाडाची सर्वसामान्य नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकी

'राज्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचा निवारा मिळवून देण्यास गृहनिर्माण विभाग कटिबद्ध आहे. शासनाच्या माध्यमातून गृहनिर्मितीसाठी जागा उपलब्ध झाल्यास सर्वांसाठी घर या योजनेचे उद्दिष्ट सफल होऊ शकेल. परवडणाऱ्या दरात हक्काची दर्जेदार घरं निर्माण करणे, ही म्हाडाची सर्वसामान्य नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकीच आहे', असे गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले. दरम्यान, सतेज पाटलांनी सर्व विजेत्यांना नवीन घराकरिता शुभेच्छाही दिल्या.

जितेंद्र आव्हाडांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमात औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सहभागी झाले होते.

हेही वाचा -Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्यानंतर सुरू झाला प्रकार

ABOUT THE AUTHOR

...view details