मुंबई :यंदाच्या गणेशोत्सवात तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची चांगली संधी आहे. कारण,गणेशोत्सवात म्हाडाचे कोकण मंडळ ४,०१७ घरांसाठी सोडत काढणार आहे. या सोडतीच्या घरांसाठी अर्जविक्री आणि स्वीकृतीस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. कोकण मंडळातील विरार-बोळींज, बाळकूम, शिरढोण, डोंबिवली, खोणी गोठेघर येथील एकूण ४०१७ घरांच्या सोडतीसाठी येत्या आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे म्हाडा कोकण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
१ ऑगस्ट पासून अर्ज विक्री :जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १ ऑगस्टपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात करण्यात येईल. म्हाडाच्या मेमध्ये काढलेल्या घरांच्या सोडतीला नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ४,६५४ घरांपैकी फक्त २,२१९ घरांसाठीच सोडत काढावी लागली आहे. त्याचप्रमाणे विक्री न झालेल्या घरांची संख्या मोठी असल्याची चिंता मंडळाला सतावत आहे. कमीतकमी ६०० हून अधिक सोडत विजेत्यांनी आपली घरे परत केली आहेत. या कारणामुळे फक्त १५०० घरेच विकली गेल्याने म्हाडा मंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
शिल्लक घरांमुळे संख्येत वाढ :आता या सर्व पार्श्वभूमीवर शिल्लक घरांसाठी जुलैमध्ये पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे मंडळाने यापूर्वीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे आता तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ३ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती, पण आता ही संख्या ४ हजाराहून अधिक झाली आहे. मे मध्ये निघालेल्या सोडतीच्या शिल्लक घरांमुळे या संख्येत वाढ झाली आहे. तर विरार येथील बोळींजसाठीच्या घरास ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील शिल्लक घरांमध्ये आणखी काही घरांची भर पडली आहे. त्याशिवाय, मंडळाला २० टक्के योजनेनुसार बाळकूम येथील काही घरेही भेटली आहेत.
सोडतीतील घरांच्या किंमती :या सोडतीतील घरांच्या किंमती २० लाखापासून ते ४० लाख दरम्यान असणार आहेत. मुंबईच्या सोडतीसाठी मोठी स्पर्धा असल्याने जे अयशस्वी अर्जदार असतील त्यांना कोकण मंडळातील घरांसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेत ६५६, २० टक्के योजनेत १०८२, कोकण मंडळ प्रथम प्राधान्यमध्ये २२११, पत्रकार (डिजिटल)मध्ये ६७ अशी योजनानिहाय घरांची संख्या आहे.
हेही वाचा :
- म्हाडातून सर्वसामान्यांनाही मिळणार आलिशान घरांचीही लॉटरी, जाणून घ्या किमती
- Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणं आणखी सोपं; एकदाच नोंदणी करुन अर्ज करता येणार
- MHADA Lottery : म्हाडाच्या ९३६ सदनिकांची सोडत जाहीर; असा करा घरबसल्या ऑनलाईन अर्ज