मुंबई - उपकरप्राप्त जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेऊनही पाच वा त्यापेक्षाही अधिक काळ काम सुरू न करणाऱ्या बिल्डरांना अखेर म्हाडाच्या मुंबई इमारत पुनर्रचना आणि दुरुस्ती मंडळाने रडारवर घेण्यास सुरुवात केली आहे. असे 464 बिल्डर आढळले असून आता या बिल्डरांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे, तर 464 पैकी आतापर्यंत 250 बिल्डरांना नोटिसा पाठवण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
दक्षिण मुंबईतील 14 हजारांहून अधिक उपकरप्राप्त जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आहे. अशात जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत असून त्यातही पुनर्विकासास परवानगी दिलेल्या इमारती कोसळल्याची धक्कादायक बाब मिश्रा मेंशन, भानुशाली इमारत दुर्घटनेतून समोर आली. यानंतर दुरुस्ती मंडळाला जाग आली असून मंडळाने पुनर्विकासास परवानगी दिलेल्या आणि अद्यापही प्रकल्प पूर्ण न झालेल्या प्रकल्पाचा आढावा घेतला असता 464 बिल्डरांनी ना हरकत प्रमाणपत्र घेऊनही काम सुरू न केल्याची बाब उघड झाली. यानंतर डोंगरे यांनी या बिल्डरांना नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीचे वृत्त सर्वात आधी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केले होते.