मुंबई -सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाचे मुंबईमध्ये असंख्य भूखंड आहेत. मात्र, आपल्या मालकीचे किती भूखंड आहेत या बाबत म्हाडालाच माहिती नाही. याचा शोध घेण्यासाठी म्हाडाने 'ऑनलाईन'चा डिजिटल मार्ग स्वीकारला आहे, यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये घरे बांधण्यासाठी जागेची कमतरता आहे. म्हाडाला नवीन प्रकल्पांची सुरुवात करणे कठीण जात आहे. त्यामुळे स्वत:च्या अखत्यारीत येणारी जागा किती आहे, कोणत्या जागेवर अतिक्रमणे आहेत याबाबत माहिती करून घेण्याची वेळ म्हाडावर आली आहे. यासाठी माहिती ठेवणारा एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने सर्व माहिती अद्ययावत करण्याचे काम म्हाडाने हाती घेतले आहे.
पुढील काही महिन्यांतच म्हाडाच्या जमिनींसह इंजिनीअरिंग, आर्किटेक्ट, बिलिंग या बाबींची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मागील झालेल्या घरांच्या सोडतीची माहिती पाहिल्यास डिसेंबर 2018मध्ये मुंबईत 1 हजार 384 आणि जून 2019 मध्ये फक्त 217 घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यावेळी अर्जदारांची संख्या लाखोंच्या घरात गेली होती. भविष्यात घरे उपलब्ध व्हावीत यासाठी भूखंडांची सर्व माहिती एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
हेही वाचा - मुंबईत दहावी नापास डॉक्टरला बेड्या; बोगस प्रमाणपत्रांवर थाटले होते रुग्णालय
काही दिवसांपूर्वीच म्हाडा प्राधिकरणाने संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या मास्टर लिस्टसाठी ऑनलाईनचा प्रयोग केला होता. त्याला मोठा प्रतिसाद देखील मिळाला. त्याच धर्तीवर मुंबईतील जागांचा आढावा घेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक भागातील सबंधित अधिकाऱ्यांकडून जमिनींच्या सर्व नोंदी नोंदवण्याचे काम सॉफ्टवेअरच्या सहाय्याने केले जात आहे.