महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Exclusive : नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासातील एल अँड टी कंपनीचे कंत्राट होणार रद्द!

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असा नायगाव बीडीडी चाळ प्रकल्प आणखी काही वर्षे मागे जाणार हे आता निश्चित झाले आहे. कारण, नायगाव प्रकल्पाचे कंत्राट ज्या एल अँड टी कंपनीला देण्यात आले होते तिने या प्रकल्पातून माघार घेतली आहे.

बीबीडी चाळ
बीबीडी चाळ

By

Published : Nov 7, 2020, 12:08 AM IST

Updated : Nov 7, 2020, 7:51 AM IST

मुंबई- राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असा नायगाव बीडीडी चाळ प्रकल्प आणखी काही वर्षे मागे जाणार हे आता निश्चित झाले आहे. कारण, नायगाव प्रकल्पाचे कंत्राट ज्या एल अँड टी कंपनीला देण्यात आले होते तिने या प्रकल्पातून माघार घेतली. एल अँड टीने माघार घेऊ नये यासाठी त्यांची मनधरणी करूनही काही फायदा न झाल्याने म्हाडाची डोकेदुखी वाढली आहे. आता म्हाडाने एल अँड टीचे कंत्राट रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती म्हाडातील विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. हे कंत्राट रद्द करत नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. त्यानुसार म्हाडाकडून लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात येणार आहे. समितीच्या हिरव्या कंदीलानंतर यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पात्रता निश्चिती प्रक्रियेतच प्रकल्प अडकला

शिवडी, वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव अशा चार ठिकाणी बीडीडी चाळ वसलेली आहे. या चाळी जवळपास 100 वर्षे जुन्या असून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या चाळींच्या पुनर्विकासाची मागणी होत होती. पण पुनर्विकास काही होत नव्हता. त्यामुळे अखेर राज्य सरकारने ही जबाबदारी म्हाडाकडे दिली. त्यानुसार म्हाडाने शिवडी वगळता वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या तीन चाळीचा पुनर्विकास तीन वर्षांपूर्वी हाती घेतला. तर प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढली. नायगावचे कंत्राट एल अँड टीला, ना.म. जोशीचे शापुरजी-पालनजीला तर वरळीचे कंत्राट टाटा हौसिंगला मिळाले आहे.

कंत्राट बहाल केल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने सर्वात आधी रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय घेतला. या कामाला सुरुवात केली. पण काही रहिवाशांनी या पात्रता निश्चितीला विरोध केला. त्यातही नायगावमधून जोरदार विरोध झाला. येथील रहिवाशांनी पात्रता निश्चितीच होऊ दिली नाही. पात्रता निश्चिती हा प्रकल्पाचा पहिला टप्पा असताना हाच टप्पा तीन वर्षांत पूर्ण होऊ शकलेला नाही. तेव्हा हा टप्पा पूर्ण कधी होणार आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार हा मोठा प्रश्न आहे.

बीबीडी चाळ

तीन वर्षात एल अँड टी कंटाळली?

नायगावचे कंत्राट मिळून तीन वर्षे झाली. मात्र या तीन वर्षांत पात्रता निश्चितीच पूर्ण झालेली नाही. तर येथील रहिवाशांचा विरोध पाहता हा टप्पा आणखी पुढचे काही वर्षे पूर्ण होण्याची चिन्हे नाही असे म्हणत एल अँड टीने अखेर नायगाव प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपले कंत्राट रद्द करावे असे पत्र म्हाडाला पाठवले आहे. या पत्रानंतर म्हाडाची चिंता चांगलीच वाढली होती. त्यामुळेच या पत्राबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र 'ईटीव्ही भारत' ला यासंबंधीची अधिकृत माहिती मिळाली आणि त्यानुसार एल अँड टी नायगाव बीडीडी प्रकल्पातून माघार घेत असल्याचे वृत्त सर्वांत आधी 'ईटीव्ही भारत' ने प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत एल अँड टीचे मन वाळवण्यासाठी प्रयत्न करा असेच आदेश म्हाडाला दिले.

बीबीडी चाळ

मनधरणी करण्यात म्हाडा अपयशी

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाने एल अँड टीची मनधरणी करत त्यांना आपला निर्णय रद्द करण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एकदा नव्हे तर दोनदा एल अँड टी शी बैठक घेतली, त्यांची मनधरणी केली. पण म्हाडा, मुंबई मंडळ मनधरणी करण्यात अयशस्वी ठरले. काही केल्या एल अँड टी आपला निर्णय रद्द करायला तयारच होताना दिसत नाही. त्यामुळे आता थकलेल्या मुंबई मंडळाने एल अँड टीचा निर्णय मान्य करत त्यांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तसे पत्र आता उच्च स्तरीय समितीला लवकरच पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता नायगावचे कंत्राट रद्द करत नव्याने बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. तर या वृत्ताला म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल दिग्गीकर यांनी दुजारो दिला आहे. असे पत्र आम्ही उच्च स्तरीय समितीला पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. पण म्हाडाच्या या निर्णयामुळे आता म्हाडाला नव्याने नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात करावी लागणार आहे. यात आता बराच वेळ जाणार हे मात्र नक्की.

Last Updated : Nov 7, 2020, 7:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details