मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधतांना मुंबई :भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातीलच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती.
मनमिळावू आणि दिलदार नेता : आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
नितीन गडकरी :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. गिरीषजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात होते. पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जीवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व असणाऱ्या गिरीषजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी :राजकीयदृष्ट्या भाजपला अतिशय प्रतिकूल काळ असताना पुण्यात भाजपला वाढवण्यात, मजबूत करण्यात गिरीषजींचे मोठे योगदान राहिले आहे. एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून ते कायम स्मरणात राहतील. महाराष्ट्रात विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले. ते माझे अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक मित्र होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सावरण्याची शक्ती देवो, असे गडकरी म्हणाले.
शरद पवार :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गिरीश बापटांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे शरद पवार यांनी ट्विट केले आहे.
अजित पवार :विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरू गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचे सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिले जायचे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापटांना ट्विट करून श्रद्धांजली वाहिली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार. 2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती, असे फडणवीस म्हणाले.
योगदान सदैव स्मरणात राहील : पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : Girish Bapat Death : खासदार गिरीश बापट यांचे निधन, सकाळी तब्येत होती चिंताजनक