महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nawab Malik Bail : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार - नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयातच अर्ज दाखल करावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Nawab Malik
नवाब मलिक

By

Published : May 1, 2023, 5:50 PM IST

मुंबई : टेरर फंडिंग केसमध्ये आरोपी असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी नकार दिला होता. न्यायालयीन कामकाजाचा भार अधिक असल्यामुळे नकार दिल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मालिक यांनी जामीन अर्जावर उच्च न्यायालयात होत असलेल्या विलंबामुळे जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यावर सुनावणी घेण्यास नकार देत, तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाकडेच जावे आणि त्यांनी जर तुम्हाला नकार दिला, तरच तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये येऊ शकता, असे म्हटले आहे.

व्यस्ततेचे कारण देत तातडीच्या सुनावणीस नकार : नवाब मलिक यांच्यावर ईडीने त्यांनी दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करत त्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवला आहे. ईडीने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे, मात्र ते आजारी असल्यामुळे सध्या दवाखान्यात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्यासमोर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी व्यस्ततेचे कारण देत तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडेच जाण्यास सांगितले आहे.

मागील सुनावणीच्या वेळेस काय झाले? : न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी सूचीबद्ध झालेली याचिका सुनावणीसाठी घेता येणार नाही, असे वकील अमित देसाई यांना सांगितले. त्याचे कारण देताना, आता जी सुनावणी आली आहे त्याच्या खूप आधीपासून ज्यांचे जामीन अर्ज पडलेले आहेत, त्यांच्यावरच्या सुनावण्या सुरू आहेत. त्यामुळे आज नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक सध्या रुग्णालयात आहेत : ज्येष्ठ अधिवक्ता अमित देसाई यांनी न्यायालयाला विनंती केली होती की, नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उद्या किमान पंधरा मिनिटे तरी सुनावणी झाली पाहिजे. मलिक यांचे दोन्ही मूत्रपिंड रिकामे झाले आहेत. ते अनेक महिन्यांपासून अंथरुणावर असून सध्या उपचार घेत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणे जरुरी आहे. जामीन अर्जावर वेळेवर सुनावणी नाही झाली, तर न्याय मिळण्यास विलंब होतो. त्यामुळेच नबाब मलिक यांच्या आरोग्याकडे पाहून वैद्यकीय अहवालाच्या आधारे आपण जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ अधिवक्ता अमित देसाई यांनी केली होती. मात्र न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी, सध्या भरपूर कामांमुळे सुनावणी घेणे शक्य नसून, याबाबत आपण 2 मे रोजी सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले.

हेही वाचा :Vajramuth Rally : 'वज्रमूठ' सभांचा परिणाम निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल, राजकीय विश्लेषकांचे मत

ABOUT THE AUTHOR

...view details