मुंबई -सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक संतोष परब मारहाण प्रकरणावरून अटीतटीची झाली होती. गुरुवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. यात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीबद्दल बोलताना, "सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी हे सर्व झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली आहे," असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केले. ( Devendra Fadnavis on Sindhudurg District Bank Result 2021 )
ट्विटमध्ये काय?
सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय! केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, सर्व भाजप नेते, कार्यकर्ते, विजयी उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन! ( Devendra Fadnavis Tweet on Sindhudurg District Bank Result 2021 )
सिंधुदुर्ग राणे कुटुंबांचा बालेकिल्ला -
संतोष परब मारहाण प्रकरणामुळे तसेच यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांचे नाव आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक चर्चेची झाली होती. त्यातच गुरुवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सिंधुदुर्ग हा राणे कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. या कारणास्तव ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.
हेही वाचा -Sindhudurg District Bank Result : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वर्चस्व कायम; 11 जागांवर फुलले कमळ
जनता आणि ईश्वर भाजपच्या बाजूने - दरेकर
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने होतो आहे. मात्र, अशा वातावरणातही पार पडलेल्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. यामागे केवळ सिंधुदुर्गातील जनतेचा भाजपवर असलेला विश्वास आणि ईश्वराचे असलेले पाठबळ हे कारणीभूत आहे. कारण ईश्वरी चिठ्ठी टाकल्यानंतर त्याचा कौलही भाजपच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. ( Pravin Darekar on Sindhudurg District Bank Result 2021 )
प्रसाद लाड यांनी नोंदवली नितेश राणेंविरोधात पोस्टरबाजी करणार्यांची तक्रार -
गुरुवारी मुंबईत सायन-माटूंगा परिसरामध्ये आमदार नितेश राणे यांच्या विरोधामध्ये पोस्टरबाजी करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांना डिवचण्यासाठी ही पोस्टरबाजी मुंबईमध्ये करण्यात आली होती. त्या संदर्भामध्ये शुक्रवारी सायन पोलीस ठाण्यात आमदार प्रसाद लाड यांनी तक्रार नोंदवली आहे. यासंदर्भात प्रसाद लाड म्हणाले की, "सायन- माटूंगा विभागात नितेश राणे यांच्या विरोधात घाणेरड्या शब्दात पोस्टरबाजी काल करण्यात आली होती. ज्यांनी हे पोस्टर्स लावले त्या मुलांना त्या कार्यकर्त्यांना आमच्या मुलांनी पाहिले. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला गेले असता पोलिसांनी तो नोंदवून घेतला नाही. त्यासाठी आज मी स्वतः सायन पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भामध्ये तक्रार दिली आहे. त्याचबरोबर हे पोस्टर लावण्यामागे कोणाचा हात होता? सरकारला घाबरून हे काम चालू आहे का? असेही ते म्हणाले आहेत. फक्त पोस्टर्स लावण्यात आले नाहीत, तर फेसबुक, व्हॉट्सअपवर सुद्धा नितेश राणे यांच्या विरोधात घाणेरडी पब्लिसिटी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ( Bjp Leader Prasad lad Posters Against Nitesh Rane )