मुंबई- विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती होणार का? याची चर्चा सर्वत्र होती. अखेर ही युती झाली. पण....त्याला अपवाद ठरलाय तो सिंधुदुर्ग जिल्हा. या जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत. या तीनही जागांवर शिवसेना विरोधात भाजपचे उमेदवार उभे ठाकले आहेत. त्यामुळे राज्यात जरी युती असली तरी सिंधुदुर्गात मात्र युती तुटली आहे.
हेही वाचा - 'मॉब लिंचींग' आपली संस्कृती नाही; हा शब्द पाश्चिमात्यांच्या धर्म ग्रंथात - मोहन भागवत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे आणि शिवसेनेते वैर काही संपण्याचे नाव घेत नाही. नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना देवगड-कणकवली मतदारसंघातून भाजपची उमेदवारीही मिळाली. त्यामुळे युती धर्म म्हणून शिवसेनेला राणेंचे काम करणे भाग होते. पण तसे न होता शिवसेनेने चक्क एबी फॉर्म देत सतिश सावंत यांना नितेश राणे यांच्या विरोधात उभे केले. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत पहायला मिळणार आहे. सावंत हे राणेंचे जुन्ने कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.