मुंबई -केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेले अन्यायकारी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन आणखी तीव्र केले आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून ३१ ऑक्टोबरला राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात येणार आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हुतात्मा दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत या दिवशी राज्यभरात ‘किसान अधिकार दिवस’ पाळला जाणार असून, या काळ्या कायद्यांविरोधात सत्याग्रह करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
वर्ध्यात होणार कार्यक्रम
या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सत्याग्रहाचा मुख्य कार्यक्रम होणार असून त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सत्याग्रहात भाग घेऊन या जुलमी कायद्याला विरोध दर्शवतील.