मुंबई :मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील मेट्रोचे काम बघून मेट्रो सेवा कधी सुरू होणार? असा प्रश्न प्रत्येक मुंबईकराला पडतो. मात्र, आता मुंबईतील मेट्रोचे 2 मार्ग मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ हे पुढील ३ ते ५ महिन्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रवासी वाहतुकीकरता सुरू होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने जाहीर केलं आहे.
मुंबई मेट्रो 7 व मेट्रो 2 या मेट्रो मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या चाचण्या विविध पातळीवर अंतिम टप्प्यात आहेत. मेट्रो स्थानकांची कामेही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
मेट्रो 7 मार्ग कसा असणार?
पश्चिम उपनगरातील अंधेरी हा भाग अत्यंत गजबजलेला परिसर. या ठिकाणी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो सेवा सोयीस्कर ठरणार आहे. मेट्रो ७ रेड लाईन हा मार्ग अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा एकूण १६.४७५ किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्गावर एकूण १३ मेट्रो स्थानके आहेत.