मुंबई - कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या मुंबई समोर आता पावसाचे आणखी एक संकट उभे राहिले आहे. काल मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यावेळीच येत्या 24 तासात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मुंबईत आज सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे दादर, हिंदमाता, माटुंगा किंगसर्कलसह अनेक सखल भागात पाणी साचले. पाणी साचलेल्या ठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज पुन्हा पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज मुंबईत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार दुपारपर्यंत मुंबईत काही ठिकाणी अधून-मधून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. मात्र, सायंकाळनंतर पावसाने जोर पकडल्याने दादर हिंदमाता, माटुंगा येथील किंग सर्कल भागात पाणी साचले. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱया चाकरमान्यांना पाण्यातून कसरत करावी लागली.
दरम्यान, दक्षिण पाकिस्तान आणि त्याला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रावर कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कायम आहे. महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यत एक ट्रफ(द्रोणी सारखा भाग) बनला आहे. या स्थितीमुळे मुंबई आणि उपनगरात 17 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.