मुंबई :सध्या गारपीट व अवकाळी पावसाचे ढग दाटून आहेत. हवामानातील या बदलांचा परिणाम मुंबई पुण्यासह मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र यासोबतच धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांना विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भासह सोलापूर जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच जळगावसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर या मराठवाड्यातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
अवकाळी पावसाचे सावट :दरम्यान, वातावरण बदलामुळे अवकाळी व गारपीटीची स्थिती पुढचे काही दिवस सक्रिय राहणार असल्याची दाट शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी त्रस्त झाला आहे. पुढचे आणखी काही दिवस शेतकऱ्यावर अवकाळी पावसाच्या काळ्या ढगांचे सावट असणार आहे.