मुंबई - राज्यात लैगिंक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील मानखुर्द येथे घडली आहे. 38 वर्षीय आरोपीने 11 वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी पटवा याला अटक केली आहे. या आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेवण देण्याच्या बहाण्याने आरोपीने अल्पवयीन पीडितेला घरी बोलावले व तिच्यावर बलात्कार केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
घरी नेऊन बलात्कार - मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी हे एकाच वस्तीत जवळ राहतात. सुरुवातीला आरोपीने मुलीला जेवण दिले, त्यानंतर त्याने तिला घरी नेले आणि तिथेच तिच्यावर बलात्कार केला. याबाबतची माहिती समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
जालन्यातही अशीच घटना घडली होती - नोव्हेंबर 2022 मध्ये जालन्यातही एका मतिमंद महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. 30 वर्षीय मतिमंद महिलेवर 60 वर्षीय पुरुषाने बलात्कार केला होता. या घटनेने जालना जिल्हा हादरला होता. याप्रकरणी घनसावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली होती. दुसरीकडे उत्तर प्रदेशातही डिसेंबर महिन्यात एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. यामुळे ती पीडिता गर्भवती देखील राहिली होती.
मानखुर्दमध्ये सामूहिक बलात्कार - पीडित 44 वर्षीय महिलेला 24 जून 2020 रोजी आरोपीने आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिला दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने पीडितेला टॅक्सी करून तिच्या घरी नेऊन सोडले होते. दुसऱ्या दिवशी पीडितेला शरीरात वेदना जाणवल्या आणि जखमाही दिसल्या. पीडितेची प्रकृती तीन दिवसांनंतर बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले होता. हे प्रकरण त्यावेळी चर्चेत होते.
हेही वाचा -गोव्यात नेदरलँडच्या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपीस अटक