मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक कामाच्या दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने रविवारी २५ जून रोजी मेगा ब्लॉक घेतला असून मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावर अप डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सिग्नल व रुळांची देखभालीची कामे केली जाणार आहेत.
जलद मार्गावर वळविण्यात येतील - रविवारी २५ जून रोजी मध्या रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:१४ ते दुपारी ३:१८ यावेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि शिव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
१५ मिनिटे उशिराने पोहोचतील - ठाणे येथून सकाळी १०:५८ ते दुपारी ३:५९ या वेळेत अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील. त्यानंतर अप धीम्या मार्गावर गाड्या पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावरील सेवा रद्द - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी, बेलापूर, पनवेल येथून सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला आणि पनवेल, वाशी या भागात विशेष लोकल चालविण्यात येतील.
एकीकडे मेगाब्लाक घेतला जात असतानाच लोकांना पावसाचाही सामना करावा लागत आहे. अंधेरीमध्ये पावसाचा जोर होता. त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याचे दिसत होते. तसेच आज शिवाजीनगर परिसरात पावसाळ्या पूर्वीची कामे करत असताना दोन जणांचा मृत्यू मॅनहोलमध्ये पडून झाला आहे.