मुंबई- शहरात सध्या अनेक पूल धोकादायक झाले आहेत. या पूलांवरून श्रीगणेशाच्या मिरवणूका तसेच मूर्ती घेऊन जाणारी वाहने जाण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने आढावा बैठकीत केली होती. त्यावर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्यासमवेत संयुक्त पाहणी करूनच वाहतुकीचा निर्णय घेतला जाईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.
मुंबईत गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या आधी व अनंत चतुर्थी दिवशी गणेश आगमन तसेच विसर्जनाच्या दिवशी मोठ्या मिरवणुका निघतात. त्यात मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झालेले असतात. मोठ-मोठ्या वाहनांचाही त्यामध्ये सहभाग असतो. या वर्षी हिमालय पूल दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्यावर पालिकेने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता मुंबईमधील 29 पूल धोकादायक परिस्थितीमध्ये असल्याचे समोर आले आहे. या पुलांपैकी 8 पूल पाडण्यात आले असून 12 पूलांचा वापर बंद करण्यात आला आहे.