मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून आठ महिने झाले आहेत. अद्याप पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत. पालिकेचे प्रभाग किती असावे यावरून उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्याआधीच सरकारच्या नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिका कामाला लागली आहे. पालिकेची प्रभाग रचना गेल्या काही महिन्यात तिसऱ्यांदा बदलली जाणार आहे. यासाठी गुरुवारी निवडणूक आयोगाने पालिका प्रशासनासोबत बैठक ( Meeting between Election Commission and Municipal Administration ) आयोजित केली आहे. या बैठकीत नव्याने प्रभाग रचना व त्या अनुषंगाने तयारीबाबत चर्चा केली जाणार आहे.
आठ महिन्यांपासून प्रशासन राज :मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मार्च २०१७ मध्ये झाल्यानंतर ९ मार्च रोजी महापौरांची निवड करण्यात आली. ७ मार्चला बृन्मुंबई पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर ८ मार्च पासून पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल ( BMC Commissioner Iqbal Singh Chahal ) यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. गेले आठ महिने पालिकेवर प्रशासक आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्या वाढीच्या आधारावर मुंबईतील वॉर्ड वाढवण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील २२७ असलेल्या वॉर्डसंख्येत ९ वॉर्ड वाढवण्यात आल्याने एकूण वॉर्डची संख्या २३६ केली. त्यानुसार प्रभार रचना जाहिर करून ३० मे रोजी (ओबीसी आरक्षण वगळून) मुंबई महापालिकेने आरक्षण सोडत काढली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्यास मान्यता दिल्याने २९ जुलै रोजी पुन्हा ओबीसी आरक्षणासह लॉटरी काढली.