मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते दुष्काळी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौर्यावर रवाना झाले. राज्यातील दुष्काळात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांनी हा दौरा सुरू केला आहे. ते विविध ठिकाणी शेतकरी, स्थानिकांच्या भेटी घेणार आहेत.
लोकसभा निवडणूकीत पवार वयाच्या ७८ व्या वर्षा तब्बल ७९ सभा घेत भाजप सरकारच्या विरोधात रान उठवले. महाआघाडीतील उमेदवारही आपलेच असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील मुरली देवरा, उर्मिला मातोंडकर आदी उमेदवारांसाठी तर राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही सभा घेतल्या. वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेत त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. मात्र, नरेंद्र मोदी यांना तितक्याच ताकदीने शरद पवार यांनी उत्तरे दिल्याने त्यांच्या टीकेला महत्व उरले नाही, असेही चित्र पाहायला मिळाले.