मुंबई - कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी, त्याचा तुटवडा भासू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष लक्ष ठेऊन आहेत. सातत्याने अधिकाऱ्यांच्या, पुरवठादारांच्या बैठका घेऊन ते आढावा घेत आहेत. तर रुग्णालय, फार्मसी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेतली जात असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
कोरोनाच्या उपचारासाठी लागणारे प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधांची बाजारात अवाजवी दर आकारणी व साठेबाजी होत नसल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खात्री करावी, असे काही आढळून आल्यास संबधिताविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. या दोन्ही औषधांचा राज्यात तुटवडा होत असून, काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांनी दोन्ही औषधांच्या उत्पादक व वितरक तसेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्पादक व वितरक कंपन्यानी त्यांचे वितरक राज्यभरात वाढवावेत तसेच उत्पादन व आयात वाढवावी, अशा सूचना डॉ. शिंगणे यांनी दिल्या आहेत.
रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब या दोन औषधांचे उत्पादक / आयातदार फक्त दोनच कंपन्या आहेत. त्यांचे उत्पादन राज्याबाहेर होते. रेमडेसीवरचे उत्पादन हेटेरो हेल्थकेअर, हैद्राबाद येथे होते. तर सिपला कंपनी गोव्यात उत्पादन करते. टोसीलीझुमॅबची आयात मे. रोश कंपनी करते तर मे. सिपला ही कंपनी वितरण करते.
पर्यायी औषधांचा सल्ला
टोसीलीझुमॅबचे पर्यायी औषध ईटियोझुलॅब हे मे. बायोकॉन या कंपनीने बाजारात आणले आहे. टोसीलीझुमॅबची आयात मर्यादीत असल्याने रुग्णांची हेळसांड होवू नये, यासाठी उपचार करताना ईटियोझुलॅब या पर्यायी औषधाचा वापर डॉक्टरांच्या सल्याने करावा असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
उपलब्ध औषधांची यादी प्रसिद्ध
महाराष्ट्रात मिळणाऱ्या या औषधाचा तपशील तसेच विक्रीचे तपशील घेण्याबाबत डॉ. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दर दिवशीच्या तपशीलावर ते स्वत: नजर ठेवून आहेत. तसेच गरजू रुग्णांना औषध कुठे उपलब्ध आहे याबाबत वितरकांची यादी प्रसिध्द केली आहे. औषधे उपलब्ध करुन देण्यास मदत करण्याचे काम अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केले जात आहे.
प्रत्यक्ष भेट आणि तपासणी