मुंबई :कोरोना काळात वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारपासून कोरोना काळात झालेल्या खरेदीच्या चौकशीला सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर पालिकेत कोरोना काळात ज्या स्वरुपाचे टेंडरिंग झाले त्यात काही विशिष्ट कंपन्यांना टेंडर देण्यात आल्याचा आरोप आहे. या विशिष्ट कंपन्यांकडूनच वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली होती. या संपूर्ण खरेदीची चौकशी ईडीमार्फत सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई महानगर पालिकेच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला नोटीस बजावल्याची माहिती आहे.
किरीट सोमय्यांचा आरोप :कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याची तक्रार सातत्याने विरोधी पक्षाकडून केली जात होती; पण कोरोना काळातील खरेदीला चौकशीच्या फेऱ्यात आणता येणार नाही, असे मुंबई मनपाने सांगितले होते. कोरोना काळात मुंबई पालिकेत वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. लाईफ लाईन मॅनेजमेंट प्रकरणातील हे प्रकरण आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळीकतेचा वापर करुन अस्तित्वात नसलेल्या संजय फाटकर यांच्या कंपनीला जम्बो कोव्हीड सेंटर चालविण्यासाठी करार केला होता. त्यांनी दिलेली कागदपत्रे बोगस होती का? हे चौकशीअंती समोर येणार आहे.
बीएमसीचे इतर घोटाळेसुद्धा चर्चेत : मुंबई महापालिका इतर प्रकरणातील घोटाळ्यांमुळेसुद्धा बदनाम झाली आहे. 2022 मध्ये मुंबईमधील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांत ९३८० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. यावर राज्य सरकारची मंजुरी घेण्यात आली होती. यानंतर तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचा खुलासा पालिका प्रशासनाकडून करण्यात होता.