मुंबई -राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी सत्राच्या परीक्षा एका महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे २५ मे रोजीपासून होणार्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा आता २४ जूनपासून होणार आहेत.
कोविड ड्युटीसाठी परीक्षा पुढे ढकलली -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्र २०२० च्या लेखी परीक्षा जानेवारीमध्ये सुरळीत पार पडल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्र २०२१च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उन्हाळी सत्राच्या परीक्षा एका महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. त्या मागचे कारण की, पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कोविड ड्यूटी लावण्यात आली आहे.
परीक्षा २४ जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय -
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्राची परीक्षा २५ मेपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे सर्वच विद्यार्थी कोरोना ड्युटीवर असल्याने परीक्षा घेण्याचे झाल्यास त्यांना ४५ दिवसांची अभ्यासासाठी सुट्टी देण्यात यावी किंवा परीक्षा एक महिना पुढे ढकलून विद्यार्थ्यांना ४५ दिवसांची अभ्यासासाठी सुट्टी देण्याची मागणी मार्डकडून करण्यात आली होती. या पत्राची दखल घेत विद्यापीठाचे कुलगुरू, परीक्षा नियंत्रक व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यामध्ये ३० मार्चला झालेल्या चर्चेनंतर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची २५ मेपासून सुरू होणारी परीक्षा २४ जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या वेळापत्रकानुसार २४ ते ३० जूनपर्यंत परीक्षा चालणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.