महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाची मुदत आठवडाभरासाठी वाढवली, आंदोलन मात्र सुरुच राहणार

शासनाने प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवल्याने काहीसा दिलासा विद्यार्थ्यांना मिळाला आहे. मात्र, अद्याप कोणताही आदेश शासनाकडून मिळाला नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

आझाद मैदानावर विद्यार्थी आंदोलन करत आहेत

By

Published : May 13, 2019, 11:46 PM IST

मुंबई- पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची मुदत एक आठवड्याने वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाची परवानगी घेतली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयाने मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कोणताही आदेश आम्हाला मिळाला नसल्याने आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

आझाद मैदानावर विद्यार्थी आंदोलन करत आहेत

सर्वोच न्यायालयाने यावर्षी मराठा आरक्षणानुसार पदव्युत्तर प्रवेश देण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे शेकडो मराठा विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. यापार्श्वभूमीवर गेले सात दिवस मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते.

सोमवारी या आंदोलनाची दखल शासनाला घ्यावी लागली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची ही भेट घेतली होती. नव्याने प्रवेशासाठी मंगळवारी तीन वाजेपर्यंतची मुदत होती. या वेळेपूर्वी शासनाने मुदत वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले असते किंवा लाखो रुपये शुल्क भरून खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे भाग पडले असते. मात्र, आता शासनाने प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवल्याने काहीसा दिलासा विद्यार्थ्यांना मिळाला आहे. मात्र, अद्याप कोणताही आदेश शासनाकडून मिळाला नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

दरम्यान, सायंकाळी गिरीष महाजन यांनी आझाद मैदानात विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर प्रवेशाची मुदत तीन ते चार दिवसांनी वाढविण्यात येईल. त्याचप्रमाणे अध्यादेश काढण्यासाठी आचारसंहिता शिथिल केली जावी यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला जाईल, असे ही आश्वासन दिले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details