महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Get Clean Water : मुंबईकरांना स्वच्छ, मुबलक पाणी मिळण्यासाठी उपाययोजना सरु - जलवहन बोगद्याची कामे केली जाणार

मुंबईकरांना रोज ३८५० दशलक्ष पाणीपुरवठा केला जातो. लोकसंख्येच्या प्रमाणात हा पाणीपुरवठा कमी आहे. मुंबई महापालिकेकडून नवीन उपायोजना केल्या जात आहेत. मुंबई बाहेरील धारणांपासून, जलवाहिन्या बदलणे, जल शुद्धीकरण केंद्र, जलवहन बोगद्याची कामे केली जाणार आहेत. नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळावे त्यात खंड पडू नयेत म्हणून पालिकेने १३७६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai Get Clean Water
Mumbai Get Clean Water

By

Published : Feb 5, 2023, 10:05 PM IST

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपलिकेच्या हद्दीतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी व पुरवठा यातील तुटवडा कमी करण्यासाठी अपारंपारिक स्त्रोतांचे शोध घेण्यात येत आहेत. मलजलाचे पुनर्वापर व पुन:श्चक्रिकरणामुळे पर्यायी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. यासाठी कुलाबा मलनि:सारण केंद्रातील मलजलाचे पिण्यायोग्य पाण्यामध्ये रुपांतरीत करण्याचा प्रतिदिन १२ दशलक्ष लिटर क्षमता असलेला 'आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रिया प्रकल्प करण्याचे पालिकेने नियोजिले आहे. सदर कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरुअसून त्यासाठी २३२ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

जलशुद्धीकरण केंद्र :मुंबईला पाणीपुरवठा करण्यापूर्वी भांडूप संकुल येथे जलशुद्धीकरण केले जाते. त्यानंतर ते पाणी नागरिकांना पाठवले जाते. भांडुप येथे १९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाची उभारणी ४४ वर्षापूर्वी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जलशुद्धीकरण प्रकल्प संरचनात्मक दृष्ट्या कमकुवत झाला असून त्याचे आयुर्मान संपुष्टात येत आहे. भविष्याचा विचार करता नविन जलशुध्दीकरण प्रकल्पाची नितांत आवश्यकता असल्याने प्रतिदिन २००० दशलक्ष लिटर क्षमतेचा नविन जलशुध्दीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. तो पर्यंत जुना १९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प कार्यरत राहील. सदर कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी १३५० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

जलवहन बोगद्याची बांधकामे केली जाणार :अमर महल (चेंबूर) ते वडाळा आणि पुढे परेल पर्यंत (९.७० कि.मी.) : अमर महल (चेंबूर) ते प्रतिक्षा नगर वडाळा पर्यंतच्या ४.२ कि.मी. लांबीच्या जल बोगद्याचे पहिल्या टप्प्याचे खोदाई काम ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. वडाळा ते परेल या दरम्यान दुसऱ्या टप्प्याच्या खोदाईचे काम प्रगतीपथावर आहे. सदर जलबोगद्याचे काम माहे एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर एफ उत्तर, एफ दक्षिण, ई व एल विभागाच्या अंशता भागात आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट व वडाळा ट्रक टर्मिनस परिसरात पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे.

पाणी पुरवठ्यात सुधारणा :अमर महल (चेंबूर) ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत (५.५० कि.मी.) बोगदा खोदाई यंत्राद्वारे अमर महल (चेंबूर) ते ट्रॉम्बे उच्चस्तर जलाशय (आरसीएफ) दरम्यानच्या पाहिल्या टप्प्यातील ३.५ कि.मी. लांबीच्या जलबोगद्याच्या खोदाईचे काम मे २०२२ मध्ये पूर्ण झाले आहे. त्यानंतर ट्रॉम्बे निम्नस्तर जलाशय ते ट्रॉम्बे उच्चस्तर जलाशयादरम्यान दुसऱ्या टप्प्याचे १.८ कि.मी. जो काम डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण झाले आहे. जल बोगद्यातील आरसीसी अस्तरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून ते काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे एम पूर्व व 'एम पश्चिम विभागाच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे.

पालिका ४३३ कोटी रुपये खर्च करणार :पवई ते पाटकोपर दरम्यानच्या उर्वरित ४.२ कि.मी. जलबोगद्याच्या बांधकामाकरिता माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये कार्यदिश देण्यात आला असून सदर काम प्रगतीपथावर आहे. बाळकूम ते मुलुंड सदर प्रकल्पाच्या व्यवहार्यता सविस्तर अभियांत्रिकी, बांधकाम पर्यवेक्षणाच्या कामासाठी सल्लागारमार्फत निविदा बनविण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर जलबोगद्याच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्तीच्या निविदा मागविण्यात येणार आहेत. यासाठी पालिका ४३३ कोटी रुपये खर्च करणार आहे.

जलाशयांची दुरुस्ती :मुंबईकरांना १०० किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या धरणातून पाणी येते. धरणातील पाणी मुंबईत भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते त्यानंतर ते विविध ठिकाणी असलेल्या जलाशयांमध्ये साठवले जाते. तेथून नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. ट्रॉम्बे निम्नस्तर व उच्चस्तर जलाशय आणि भांडूप व येवई महासंतुलन जलाशयाच्या दुरुस्तीच्या एका कप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या कप्प्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच पवई उच्चस्तर व निम्नस्तर जलाशय व घाटकोपर निम्नस्तर जलाशयाच्या दुरुस्तीसाठीच्या निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहेत. मलबार टेकडी जलाशयाच्या पुर्नबांधणीच्या कामास या वर्षात सुरुवात झाली आहे. तसेच भंडारवाडा टेकडी, गोलाजी टेकडी, BUDP येथील जलाशयांच्या प्राथमिक अभियांत्रिकीथी काम प्रगती पथावर आहेत यासाठी पालिका ११९.५० कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे.

जलवाहिन्यांची कामे :बाळकुम ते सॅडल टनेल पर्यंत ३००० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनीचे काम तसेच चिंचवली ते येवई दरम्यान ३००० मिलीमीटर व्यासाची मध्य वैतरणा (मिसिंग लिंक) मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम ऑगस्ट २०२२ व जून २०२२ मध्ये पूर्ण झालेले आहे. भांडूप संकुल येथे जलबोगद्यापासून जलप्रक्रिया केंद्रापर्यंत ४००० मिलीमीटर व्यासाच्या अंतर्गत जलवाहिनी जोडनीचे काम पूर्ण झाले आहे. तानसा (पूर्व) आणि (पश्चिम) येथील भांडूप अॅकर ब्लॉक ते मरोशी गेट टप्पा-दोन दरम्यान अस्तिवात असलेली १८०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी बदलून २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मरोशी ते सहार गाव दरम्यान जूनी १४५० मिलीमीटर व्यासाच्या जूनी जलवाहिनी बदलून २००० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. यासाठी १३६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबईमधील विहार धरणाचे ओसंडून वाहणारे पाणी भांडुप संकुल जल शुद्धीकरण केंद्रावर नेण्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.

२०० द.ल.लि.प्रकल्पाची मनोरी येथे उभारणी :मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करून मागणी आणि पुरवठा यामधील तूट कमी करण्याकरिता विश्वासार्ह आणि हवामान बदल संवेदनक्षम स्त्रोत विकसित करण्यासाठ बृहन्मुंबई महानगरपालिकेने मनोरी येथे २०० द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचा नि:क्षारीकरण प्रकल्प ४०० द.ल.लि. प्रतिदिन पर्यंत विस्तारित क्षमतेसह बाधण्याचे प्रस्ताविले आहे. याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्ण केले असून अहवालाची तपासणी सल्लागारामार्फत करण्यात आली आहे. निविदा बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून प्रकल्पाच्या विकसनासाठी जागतिक स्पर्धात्मक निविदा मागविण्यात येत आहेत. सदर कामासाठी सन २०२३-२४ मध्ये २०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्ताविली आहे.

पालिकेचा अर्थसंकल्प वाढला :देशातील सर्वात मोठी महानगर पालिका असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा २०२३ - २४ चा मागील वर्षापेक्षा ७ हजार कोटी रुपयांची वाढ असलेला ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. २०२२ - २३ चा ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सदा करण्यात आला होता. मागील वर्षापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे १४.५० टक्के इतकी वाढ झाली आहे. पाणी पुरवठा प्रकल्प विभागासाठी सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्पीय अंदाज १८८७.८८ कोटी आणि सन २०२३-२४ अर्थसंकल्पीय अंदाज १३७६ कोटी इतकी प्रस्तावित आहे.

हेही वाचा -K Chandrashekar Rao in Nanded : 'जय महाराष्ट्र'चा नारा देत केसीआर यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री; म्हणाले, अबकी बार...

ABOUT THE AUTHOR

...view details