मुंबई - मुंबईमध्ये झोपडपट्टी भागात मिसेल रुबेला म्हणजेच गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. (Measles outbreak in mumbai). जानेवारीपासून आतापर्यंत १०९ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत ७ लाख ३५ हजार २५४ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात ५८४ संशयित रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण गोवंडी या विभागात आढळून येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Mumbai municipal health department).
मुंबईत ७ लाख घरांचे सर्वेक्षण -मुंबईमध्ये एम पूर्व म्हणजेच गोवंडी विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासुन गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून दोन महिन्यात ८४ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत जानेवारीपासून आतापर्यंत एकूण १०९ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर आजपासून आरोग्य कर्मचार्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जिवनसत्व "अ" देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसेच ९ महीने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाचे अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकार्यामार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे.
गोवंडीत सर्वाधिक रुग्ण -एम पूर्व गोवंडी विभागात एकूण ७९९५३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये ५० तर एकूण ७४ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईत ७ लाख ३५ हजार २५४ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यात ५८४ संशयित गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत अतिरिक्त सत्रात ४९४७ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
१ मृत्यू तर ३ संशयित मृत्यू -मुंबईत गोवरमुळे मागील महिन्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा गोवंडी रफिक नगर येथील राहणार आहे. त्यानंतर गेल्या चार दिवसात ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. हे ३ मृत्यू संशयित मृत्यू आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
लसीकरण करून घ्या -मुंबईमधील झोपडपट्टी विभाग असलेल्या मानखुर्द गोवंडी एम ईस्ट, एम वेस्ट, जी नॉर्थ धारावी, कुर्ला एल वॉर्ड, पी नॉर्थ मालाड येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून या याठिकाणी रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. विशेष करून गोवंडी विभागात रुग्णांची संख्या अधिक असल्याने मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईकरांनी लहान मुलांचे वेळीच मिसेल रुबेलावरील लस द्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.