मुंबई - मुंबईमध्ये झोपडपट्टी भागात मिसेल रुबेला म्हणजेच गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. (Measles outbreak in Mumbai). जानेवारीपासून आतापर्यंत १०९ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत ९ लाख १६ हजार ११९ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात ६१७ संशयित रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण गोवंडी या विभागात आढळून येत असल्याने या विभागाला केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ३ सदस्सीय टीमने आज भेट देवून आढावा घेतल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Measles outbreak)
मुंबईत ९ लाख घरांचे सर्वेक्षण -मुंबईमध्ये एम पूर्व म्हणजेच गोवंडी विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासुन गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून दोन महिन्यात ८४ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत जानेवारीपासून आतापर्यंत एकूण १०९ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर आरोग्य कर्मचार्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जिवनसत्व "अ" देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसेच ९ महीने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाचे अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकार्यामार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे.
केंद्रीय पथकाने दिली भेट -मुंबईत अचानक गोवरचे रुग्ण वाढल्याने केंद्र सरकारने एक ३ सदस्य टीम मुंबईत पाठवली आहे. त्यात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC), नवी दिल्ली, लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज (LHMC), नवी दिल्ली आणि प्रादेशिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे, महाराष्ट्र यांच्या तज्ञांचा समावेश आहे. या टीमचे नेतृत्व डॉ. अनुभव श्रीवास्तव, उपसंचालक, इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम (आयडीएसपी), एनसीडीसी करत आहेत. या टीमने आज गोवंडी रफिक नगर विभागात जाऊन भेटी दिल्या. त्यानंतर हे पथक राजावाडी रुग्णालयात गेले. ज्या ठिकाणी ३ मुलांचे शवविच्छेदन करण्यात आले होते.