मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने ( Measles outbreak in Mumbai ) वाढत आहे. आतापर्यंत एकूण २६० रुग्णांची तर ३८३१ संशयित रुग्णांची नोंद ( Measles Patient in Mumbai ) झाली आहे. आतापर्यन्त एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १० मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. १९ रुग्ण ऑक्सीजनवर, ५ रुग्ण आयसीयुमध्ये तर ३ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
१९ रुग्ण ऑक्सिजनवर, ३ व्हेंटिलेटवर - मुंबईत ४८ लाख ७३ हजार ७३३ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३८३१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे २६० रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा, गोवंडी शिवाजी नगर प्रसूती गृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल, कुर्ला भाभा , क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली आदी रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १०३ बेडवर रुग्ण असून २२७ बेड रिक्त आहेत. १४१ जनरल बेडपैकी ७९, १५४ ऑक्सीजन बेड पैकी १९, ३५ आयसीयु बेड पैकी ५ तर २० व्हेंटिलेटर पैकी ३ व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात २० हजार ७४४ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.