मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण २९२ रुग्णांची, ३९४७ संशयित रुग्णांची तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गोवरचा प्रसार वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम लोक प्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांची मदत घेतली आहे. त्यानंतर आता रॅपरची मदत घेऊन, रॅप सॉंग मार्फेत जनजागृती (Measles awareness to be done through rap song) केली जाणार असल्याची माहिती, पालिकेच्या (initiative of Mumbai Municipal Corporation) आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
रॅप सॉंग द्वारे जनजागृती :मुंबईत गेल्या दोन महिन्यात गोवर संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत आणि मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. विशेष करून हे रुग्ण मुस्लिम वस्ती, अस्वच्छता असलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या या ठिकाणी आढळून येत आहेत. मुस्लिम वस्त्यांमध्ये गोवरची लस घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांची बैठक घेतली होती. गोवर पसरलेल्या विभागातील नागरिकांना या बैठकीत नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. रजा अकादमी या संस्थेद्वारे गोवरबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. जनजागृती आणखी चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून रॅप सॉंग आणि व्हिडीओ बनवले जाणार आहेत. त्यासाठी रॅपरची मदत घेतली जाणार आहे. रॅपरद्वारे बनवले गेलेले व्हिडिओ पालिकेच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जाणार आहेत. तसेच हे व्हिडिओ गोवर पसरलेल्या विभागात सोशल मीडियावर पाठवले जाणार आहेत, अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.
महिनाभर मुलांची घ्या काळजी :मुंबईत सप्टेंबर ऑक्टोबरपासून गोवरच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. लसीकरण झालेले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया आदी कारणामुळे रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गोवर हा आजार प्रतिकार शक्ती कमी झाल्यावर होतो. हा आजार झालेल्या मुलाची रोग प्रतिकार शक्ती आणखी कमी झालेली असते. गोवर मधून बरे झाल्यावर त्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती पुन्हा निर्माण होण्यास महिनाभराचा कालावधी लागतो. या दरम्यान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मुलांकडे या महिनाभरात काळजी घेतली गेली नाही तर, त्यांना पुन्हा आजार होऊ शकतात अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.