मुंबई - मुंबईत गेले 11 महिने कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना काही प्रमाणात कमी झाला. मात्र, मुंबईकर गर्दीत मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे आदी सूचना पाळत नसल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढताना निदर्शनास आले आहे. मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याने आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रस्त्यावर आणि लोकल ट्रेनमध्ये मास्क वापरण्याबाबत जनजागृती केली.
नागरिकांना मास्क घालण्याबाबत सांगताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हेही वाचा -स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्याना शासकीय सेवेत सामावून घेणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
कोरोना नियमांची पायमल्ली
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. राज्य सरकार, महापालिका आणि आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे अकरा महिन्यांनी कोरोना आटोक्यात आला होता. रोजची 2600 ते 2800 पर्यंत गेलेली रुग्ण संख्या 300 ते 400 पर्यंत आली होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर आणि 1 फेब्रुवारीला लोकल ट्रेनमधून सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिल्यावर रुग्ण संख्या 600 च्या वर गेली होती. आताही रुग्णसंख्या 400 ते 500 च्या दरम्यान आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर नागरिकांकडून मास्क, सॅनिटायझरचा वापर न करणे, गर्दीच्या ठिकाणी कोविडच्या नियमांचे पालन न करणे, रेल्वेमधून प्रवास करताना मास्कचा वापर न करणे या कारणाने रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने
मुंबईत कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. राज्य सरकारने कालच आढावा बैठक घेतली. या बैठकीत नियम पाळा अन्यथा लॉकडाऊन लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कोरोना संदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करावी, असा आदेश सर्व महापालिका, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाला दिला आहे. मुंबई महापालिकेनेही कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये मास्क न घालता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता कारवाई केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
महापौरांकडून जनजागृती
नागरिकांकडून नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याने कोरोना वाढत आहे. याची दखल खुद्द मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली. आज महापौरांनी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा लोकल ट्रेनने प्रवास केला. यावेळी प्रवाशांशी संवाद साधत प्रवासादरम्यान मास्कचा वापर करण्याचे आवाहन महापौरांनी केले. तसेच फेरीवाले, दुकानवाले लोकांच्या नेहमीच संपर्कात येतात. फेरीवाले, दुकानवालेही कोरोना पसरवू शकतात. यासाठी त्यांनीही मास्कचा वापर करावा, असे आवाहनही महापौरांनी केले. यावेळी मुंबईत लॉकडाऊन नको असेल तर मुंबईकरांनी मास्कचा, सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी केले.
साडेचार हजार प्रवाशांवर कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. लोकल प्रवाशांना नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, काही प्रवासी विना मास्क प्रवास करत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. विना मास्क प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार मध्य मार्गावर गेल्या 14 दिवसांत 2 हजार 60 प्रवाशांवर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 2 हजार 558 प्रवाशांवर कारवाई करून 4 लाख 50 हजार 100 रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.
हेही वाचा -महाराष्ट्र कोरोना अपडेट : रुग्ण संख्येत वाढ; मंगळवारी 3663 नवीन रुग्ण, 39 मृत्यू