मुंबई -जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लस शोधली जात आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनावरील लसीची चाचणी यशस्वी होत आहे. यामुळे आता लवकरच लस सर्वाना मिळणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच कोरोनावरील लस आधी आरोग्य कर्मचाऱ्यांनाचा दिली जाणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे करदात्या मुंबईकरांना या लसीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
'कोव्हिशिल्ड' लसीचा पहिला मान 'यांना' ; करदात्या मुंबईकरांना वाट पाहावी लागणार... - mayor kishori ON corona
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनावरील लसीची चाचणी यशस्वी होत आहे. यामुळे आता लवकरच लस सर्वांना मिळणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच कोरोनावरील लस आधी आरोग्य कर्मचाऱ्यांनाचा दिली जाणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
लसीची यशस्वी चाचणी -
मुंबईत कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला. तेव्हापासून पालिकेचा आरोग्य विभाग कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखता यावा म्हणून अनेक देशात लस शोधली जात आहे. मुंबईतही महापालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयात अमेरिकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या "कोव्हिशिल्ड" लसीची मानवी चाचणी केली जात आहे. आतापर्यंत १६३ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास केला जात आहे. आतापर्यंत एकावरही या लसीचे दुष्परिणाम झालेले नाहीत.
कोरोना नियंत्रणात -
आता लवकरच लस उपलब्ध होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. मार्चपासून जूनपर्यंत लॉकडाऊन व नंतर लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता यामुळे हळूहळू मुंबईमधील व्यवहार सुरू झाले आहेत. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्तरावर पीछेहाट करणाऱ्या कोरोनाला मात देण्यासाठी अखेर मुंबईकर सज्ज झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे अखेर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे. कोरोना विषाणूच्या संकटाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लवकरच लसही उपलब्ध होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना लस -
कोरोनावर लस आल्यावर आपल्याला लस मिळेल, अशी चर्चा सुरु असतानाच ही लस आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना व कोविड लढ्यात प्रत्यक्ष सहभागी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभाग निहाय माहिती घेऊन शिबिर आयोजित करून या कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. यामुळे ज्या करदात्या नागरिकांच्या महासूलातून ही लस विकत घेतली जाणार आहे त्या मुंबईकरांना या लसीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
कोणाला मिळणार लस?
शासकीय कर्मचारी यात परिचारिका, डॉक्टर, वॉर्ड बॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार अशा कोरोना लढ्यात थेट सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. याशिवाय खासगी कर्मचारी ज्यात रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी ज्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत.