मुंबई- नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. त्यात सत्ताधारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी केला आहे. त्यावर आरोप करणारे कोण आहेत. याची मीडियाने दखल घ्यावी नंतरच त्यांना प्रसिद्धी द्यावी, असा सल्ला देत मनसेला आरोप करण्याशिवाय दुसरे कामच उरलेले नाही, असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
मनसेचा आरोप
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात गुरुवारी (दि. 17 जून) पत्रकार परिषद घेऊन या संबंधित सर्व पुरावे माध्यमांसमोर सादर केले. यावेळी साकीनाका येथील नालेसफाईचा व्हिडिओ दाखवत, नाल्यातील गाळ नाहीतर डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांनी केला आहे, असा आरोप त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे. मनसेने कुर्ला सीएसटी रोड येथील व्हिडिओ माध्यमांना दाखवला. यामध्ये डंपरमध्ये डेब्रिज भरले जात असून वरच्या थरात गाळ टाकला जात आहे, अशा प्रकाराने डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांकडून केली जात आहे. गाळाचे वजन वाढवण्यासाठी कंत्राटदारांकडून हा प्रकार केला जात आहे. त्यामुळे आत्तापर्यंत नालेसफाईमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा मनसे केला आहे. मुंबई महानगरपालिकेत जे वीरप्पन गॅंग बसले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत महापौर यांनी दाखवावी. मुंबई महापालिकेत वीरप्पन गँगची चौकशी करा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे.